shrikantavhad950@gmail.com

व्यवसायाच्या वाटेवरील शासनमान्य अडथळे (२)… स्थानिक राजकारणी आणि गुंड

व्यवसायाच्या वाटेवरील शासनमान्य अडथळे (२)… स्थानिक राजकारणी आणि गुंड

काही वर्षांपूर्वी देशभरात बरेच युनिट असलेल्या एका मोठ्या कंपनीने आपले नगरमधील युनिट बंद करून पुण्याला शिफ्ट केले होते. कारण होते इथले लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि स्थानिक लेबर. सगळ्याच MIDC मधील लेबर कॉन्ट्रॅक्टर हे डॉन असतात. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील गुंडारासखा किंवा बिहारी बाहुबलींसारखाच प्रकार असतो हा. कंपन्यांच्या मालकांना, मॅनेजर ला धमक्या देऊन आपली कामे करून घेणे हा यांचा आवडता छंद. हे एक तर स्वतः राजकारणात सक्रिय असतात किंवा एखाद्या राजकारण्यांच्या हाताखाली काम करत असतात.

या कंपनीला स्थानिक अशाच काही लेबर कॉन्ट्रॅक्टरनी प्रचंड छळले होते. अगदी कंपनीच्या अधिकाऱ्यांची मिटिंग चालू असताना मिटिंग रूम मधे दरवाजावर लाथ मारून जाणे आणि प्लांट मॅनेजरची गचांडी धरणे इथपर्यंत मजल गेली होती. स्थानिक लेबर कडून सुपरवायजर ला धमक्या देणे मारहाण करणे हे तर नित्याचेच झाले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांना कंपनीबाहेर एकटे गाठून काम देण्यासाठी धमक्या देणे, मारहाण करणे असले प्रकार वाढले. शेवटी कंटाळून कंपनीने नगरमधील युनिटच बंद करून टाकले.

पाच वर्षांनी कंपनी पुन्हा आली. एवढा मोठा प्रोजेक्ट आणि जागा यातली गुंतवणूक अशी पडून ठेवता येत नाही. पण यावेळी कंपनीने नगर शहरातील लेबर घेणे टाळले. इतकी दहशत कंपनीने घेतली होती. कामासाठी अर्ज केलेल्यांमधे नगरचा पत्ता दिसला कि अर्ज रिजेक्ट व्हायचा. आम्ही आमच्या काही ओळखीच्यांना नगरबाहेरील पत्ता टाका असेच सांगितले होते. कंपनीने इथल्या लेबर कॉन्ट्रॅक्टर ला सुद्धा यावेळी जरा चांगल्या पद्धतीने हाताळले. काही स्थानिक लोक हाताशी घेऊन त्यांना इनहाऊस व्हेंडर म्हणून जॉईन करून घेतले. गरज पडल्यावर कामी येतील या हिशोबाने. बऱ्याच ठिकाणी त्याचा फायदा झाला. पण आता जुने दिवस पुन्हा सुरु झाले. काही महिन्यांपूर्वी पुन्हा दरवाजावर लाथ मारून मॅनेजरच्या ऑफिसमधे घुसणे, धमक्या देणे असले प्रकार झाल्याचे ऐकण्यात आले.

असले प्रकार सगळीकडे आहेत. कोणतीच MIDC या लोकांच्या तडाख्यातून सुटलेली नाही. व्हेंडरचे काम मिळवण्यासाठी दमबाजी करणे, लेबर लावण्यासाठी दमदाटी करणे, एखादी कंपनी नवीन सुरु होत असेल तर तिला आपल्याकडूनच बांधकामाचा माल घेण्यासाठी प्रवृत्त करणे, काहीवेळा तर बांधकामाचे साहित्य आधीच कंपनीच्या प्लॉट वर नेऊन टाकायचे आणि बिल पाठवून द्यायचे, कामगारांना स्टाफ ला आणण्यानेण्यासाठी लागणाऱ्या बसेस च्या काँट्रॅक्टसाठी दमदाटी करणे, असले प्रकार सगळ्या MIDC मधे नित्याचेच आहेत. दार महिन्याचे हफ्ते ठरलेले असतात.

मागे नगर MIDC मधेच एका स्थानिक गुंडाने भल्या १५-२० कंपन्यांना खंडणी मागितली होती. यावेळी मात्र कंपनी मालकांनी थेट कलेक्टर कडे धाव घेतली आणि यांना आवरा नाहीतर कंपन्या शिफ्ट करून अशी ताकीदच दिली. शेवटी कलेक्टर ने मध्यस्ती करून प्रकरण मिटवले.

काही वर्षांपूर्वी आमच्या एका आमदाराने नगरमधील एका अतिशय मोठ्या आणि प्रतिष्ठित उद्योजकाला मारहाण केली होती. त्या प्रकरणानंतर तर कितीतरी जणांनी आपले प्लांट शिफ्ट केले. पण शिफ्ट करून तरी काय फायदा. सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. फक्त इतर ठिकाणी मारहाण करत नसतील इतकेच.

कित्येक MIDC मधे या तुम्हाला जर बाहेरून जाऊन तिथे व्यवसाय करायचा असेल तर स्थानिक गुंडांना पार्टनर घेतल्याशिवाय तुम्ही कामचं करू शकत नाही. तुमच्याकडे लेबर यायची हिम्मत दाखवणार नाहीत, तुमचा माल सुरक्षितपणे कंपनीबाहेर जाऊ शकणार नाही, तुमची कंपनी सुरक्षित राहील कि नाही याचाही भरोसा नाही.

कंपन्यांच्या स्टाफ लेव्हलच्या लोकांना खास करून पर्चेस मॅनेजरना सतत दहशतीखाली जगावं लागतं. एखाद्याला काम नाही दिल तर? त्याची गॅंग असेल तर तो आपण कंपनीबाहेर पडल्यावर काही करेल का? मारहाण करेल का? अशी भीती सतत असते.

प्रत्येक MIDC या लोकांनी वाटून घेतल्यासारखी आहे. तिथल्या आमदार, खासदाराचं त्यावर नियंत्रण असतंच. स्थानिक गुंड, नगरसेवक, जी प सदस्य, पंचायत समिती सदस्य, अगदी सरपंच अशा प्रत्येकाचा यात काही ना काही सहभाग असतोच. यातला प्रत्येक जण एक स्वतंत्र डॉन आहे. त्यांच्या टोळ्या आहेत. गॅंग आहे. प्रत्येकाचा स्वतःचा एक एरिया आहे. यांना प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम दिलीच पाहिजे, तिला विरोध केला तर अगदी टोळीयुद्धासारखी परिस्थिती सुद्धा काही वेळा उद्भवते. त्यांच्यात्यांच्यातील वाद असतील तर त्यात सुद्धा कंपनीला ओढलं जातं.

ज्या लोकप्रतिनिधींनी, सरकारने या कंपन्यांना संरक्षण द्यायचं असत तेच यांना लुटायचे काम करत असतात. कंपन्या म्हणजे हक्काचा पैसा अशी यांची मानसिकता आहे. यांच्यासाठी इलेक्शनचा पैसा उभा करण्याचे मशीन वाटतात यांना.

पण एक लहानस उदाहरण सांगतो… काही वर्षांपूर्वी नगर MIDC मधील L&T चा एक प्लांट दमण ला शिफ्ट केला गेला. यातील एक मोठी मशीन शिफ्ट केली गेली. ती मशीन शिफ्ट झाल्यानंतर संपूर्ण MIDC मध्ये L&T बंद होणार अशी अफवा सुटली. अख्खी MIDC महिनाभर टेन्शन मधे होती. कारण नगर MIDC मधील जवळजवळ निम्म्या कंपन्या या L&T च्या जीवावर चालू आहेत, आणि तेवढेच किंबहुने त्यापेक्षाही जास्त कामगार L&T मुले आपले घर चालवत आहेत. हि अफवा एवढी पसरली कि कंपनीला स्वतः आम्ही कुठेही चाललो नाहीत हे सांगावं लागलं, तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. हि ताकद असते कंपनीची. ती सगळ्यांना बरोबर त्यांचात्यांचा हिस्सा देत असते, ती लुबाडण्यासाठी नसते. कंपनी, उद्योजक आपले शत्रू नसतात. त्यांनी सुद्धा खूप कष्टाने आपले व्यवसाय उभे केलेले असतात. जास्त पैसे कमावतात म्हणजे ते काही बेईमान आहेत, चोर आहेत असे नाही. ते किती कमावतात यापेक्षा त्यांच्या जीवावर किती घर चालतात हे पाहिलं तर त्यांची किंमत कळेल.

असो, सरकारने एक तर या कंपन्यांना संरक्षणाची हमी द्या, संरक्षण द्यावं, नाहीतर आपले सैन्य बाळगण्याची परवानगी द्यावी तरच आपल्या उद्योगक्षेत्राला काहीतरी भविष्य आहे… रोजगार हवे असतील तर कंपन्या हव्यात, आणि कंपन्या हव्या असतील तर त्यांना संरक्षण हवे आहे. मोठी कंपनीचं रोजगार देते असे काही नसते, लहान लहान उद्योजन सुद्धा खूप मोठा रोजगार निर्माण करत असतात, त्यांचा विचार झाला नाही तर मोठ्या कंपन्या सुद्धा राहणार नाहीत.

==========

श्रीकांत आव्हाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *