shrikantavhad950@gmail.com

व्यवसायाची सुरुवात अशी होत असते

व्यवसायाची सुरुवात अशी होत असते

एक असंच manufacturing युनिट सुरु करायचं होतं. एका मोठ्या कंपनीचा व्हेंडर होण्यासाठी प्रयत्न करत होतो. संबंधीत कंपनीच्या मॅनेजरशी चांगले संबंध असणारे एक गृहस्थ माझ्या चांगल्या ओळखीचे होते.

व्यवसाय क्षेत्रात येऊन दोनच वर्षे झाली होती. या कंपनीच व्हेंडर व्हायचं असं ठरवलं होतं. एक दिवस त्यांच्याकडे गेलो, म्हणालो, काका, मला त्या कंपनीची व्हेंडरशिप हवी आहे. काय करू सांगा… त्यांनी काही क्षण शांतपणे माझ्याकडे पाहिलं. म्हणाले तुझ्याकडे काय काय रिसोर्सेस आहेत सांग. यासाठी जागा आहे का? पैसे आहेत का? प्रशिक्षित लेबर आहेत का ? म्हटलं अजूनतरी नाही. (पहिल्या व्यवसायासाठी घरच्यांनी पैसे दिल्यांनतर पुन्हा घरून पैसे घ्यायचे नव्हते म्हणून आर्थिक दृष्ट्या थोडी अडचण होतीच.) म्हणाले आधी याची जुळवाजुळव कर, मग पुन्हा माझ्याकडे ये.

यांनतर वर्ष गेलं. प्रोजेक्ट साठी लागणारे पैसे उभे केले. एक त्या क्षेत्रातील जोडीदार सोबत घेतला, जागा पहिली, लेबर शोधले, सेटअप काय काय लागतो माहिती घेतली,, आणि पुन्हा त्यांच्याकडे गेलो. म्हटलं काका सगळी तयारी झाली आहे, आता व्हेंडर कोड कसा काढू सांगा. ते पुन्हा जरा वेळ शांत बसले, आणि म्हणाले SSI रजिस्टर केलं असेल ना? मला SSI काय आहे हेच माहित नव्हतं. म्हटलं नाही… म्हणाले अरे मग आधी SSI काढून घे. परत माघारी आलो. SSI काय असतं शोधायला एक दिवस गेला. मग कळालं लघुद्योगाचं नोंदणी प्रमाणपत्र आहे, आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळतं. दुसऱ्या दिवशी DIC मधे गेलो. फॉर्म घेतला. भरताना चुकला, नवीन फॉर्म घेतला, तोही चुकला. तिथला अधिकारी म्हणाला अरे फॉर्म च्या झेरॉक्स काढ, आणि मग भर. त्यांच्याकडून आणखी एक फॉर्म घेतला, झेरॉक्स काढल्या. ७ वेळा फॉर्म चुकला. आठव्यांदा फॉर्म भरला गेला.

परत त्यांच्याकडे गेलो. म्हटलं काका, SSI झालंय. म्हणाले अरे वा, VAT काढला कि नाही? म्हटलं नाही… या पुन्हा… परत दोन दिवस VAT साठी गेले..

परत त्यांच्याकडे गेलो… म्हणाले अरे वा. सगळं केलंय… Introduction Letter आणि कंपनीची माहित असणारे पात्र कुठे आहे दाखव जरा. म्हटलं, Introduction letter काय असतं? म्हणाले, माहित नाही? असं कसं चालेल? Introduction Letter लागतं व्हेंडर चा अर्ज करताना… परत माघारी आलो. दोन दिवस गेले Introduction Letter काय असत आणि कसं असतं याची माहिती घ्यायला. मग इंटरनेटवरून आठदहा Introduction Letter शोधले, त्यातून प्रत्येकातील थोडीथोडी माहिती घेऊन स्वतःचे Introduction Letter तयार केले, सोबत कंपनीची माहिती देणारे पत्र तयार केले आणि पुन्हा त्यांच्याकडे गेलो…
सगळे कागदपत्र पाहिल्यावर ते एकदम खुश होऊन म्हणाले, वा छान, आता तयारी झाली आहे, उद्या लेटर घेऊन कंपनीत जाऊन पर्चेस मॅनेजर ला द्या…

दुसऱ्या दिवशी कंपनीत गेलो, पर्चेस मॅनेजर ला Introduction Letter दिले, त्याने ते पाहूनच बाजूला टाकून दिले. म्हणाला आमच्याकडे व्हेंडर साठी कोणतीही आवश्यकता शिल्लक नाहीये. सगळ्या कामांसाठी व्हेंडर आहेत. सध्या काही काम देऊ शकत नाही. डोकंच बंद पडलं.. एवढं सगळं करून पुन्हा माघारी?

रात्री जरा निराशेतच त्यांना कॉल लावला, सगळी स्टोरी सांगितली… म्हणाले काही काळजी करू नको, उद्या सकाळी मॅनेजर ला भेट…

दुसऱ्या दिवशी गेलो, मॅनेजर समोर जाऊन बसलो, त्यांनी पर्चेस मॅनेजरला बोलावले आणि म्हणाले यांना आपल्याकडे काही काम असेल ते देऊन टाका… झालं, काम मिळालं.. काम खूपच क्षुल्लक होतं, पण नाही म्हणायचं नाही हे ठरवून गेलो होतो. चार दिवसात व्हेंडर कोड मिळाला आणि पायलट लॉट ची ऑर्डर मिळाली.

५-७ दिवसांनी त्यांच्याकडे गेलो. म्हणालो काका, काम झालं. पायलट लॉट ची ऑर्डर मिळाली. मग जरा ते रिलॅक्स झाले. निवांत गप्पा मारायला लागले. म्हणाले, ज्यादिवशी रात्री तू कॉल केला होता तेव्हा ते मॅनेजर साहेब माझ्या सोबतच होते, मी तुझा कॉल लाऊडस्पिकर वरच ठेवला होता, त्यांना ऐकवला, आणि तेच म्हणाले उद्या पाठवून दे म्हणून… तू खरंच तिथपर्यंत जाऊ शकतो का हे मला पाहायचं होत म्हणून मी थोडा वेळ घेत होतो, नाहीतर मागेच तुमचं काम झालं असतं…

या सगळ्या प्रोसेस नंतर माझ्या एक लक्षात आलं कि त्यांनी मला कुबड्या घ्यायचची संधी कुठेच दिली नाही. प्रत्येक काम मला स्वतःला करायला लावलं. ते हिंट द्यायचे, आणि मी ते काय आहे याचा शोध घेऊन पूर्ण करायचो. कितीतरी चुका झाल्या, पण काम पूर्ण व्हायचंच… एखाद्या MNC च व्हेंडर होणं हे सोपं काम नाहीये. तिथे आपण परिपूर्ण असायलाच पाहिजे, ते मला याच पातळीवर घेऊन चालले होते. मी टिकू शकतोय का, किंवा कुठपर्यंत जाऊ शकतो हे ते पाहत होते. आणि जेव्हा मी माघार घेत नाही हे लक्षत आल्यावर मग त्यांनी पुढचं काम केलं… ते सतत माझ्याबरोबर होते पण मी काम करतोय का हे पाहत होते, आणि पुढं काय करायच याची हिंट देत होते…

मी माझ्या कन्स्लटिंगमधे हाच पॅटर्न वापरतो. मी शक्यतो फक्त काय करायचे ते सांगतो, काम स्वतः उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यालाच करायला लावतो. यामुळे बरेच जण कमी होतात, कारण स्वतः काही करायचं म्हटलं कि नको वाटत, पण यामुळे जे खरंच व्यवसाय करण्यायोग्य आहेत तेच पुढे जातात…


व्यवसाय साक्षर व्हा…
======

© श्रीकांत आव्हाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *