व्यवसाय पहिल्या दोन-तीन वर्षातच अपयशी होण्यामध्ये महत्वाचे कारण असते ते व्यवसायाची पुरेशी माहिती नसणे. ज्यांची व्यावसायीक पार्श्वभूमी नाही, व्यवसायाविषयी प्राथमिक स्तरावरील सुद्धा मार्गदर्शन करणारे आसपास कुणी नाही अशा नवउद्योजकांना या अपयशाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. कारण अगदी प्राथमिक बाबींपासून असे नवउद्योजक पूर्णपणे अज्ञानी असतात. अशावेळी सुरुवातीच्या काळात होणाऱ्या लहान लहान चुका सुद्धा व्यवसायाला मोठे नुकसान पोहोचवतात. सर्वात मोठी चूक होते विक्रीमध्ये. विक्रीची कोणतीच माहिती नसल्यामुळे फार नुकसान होतं. व्यवसाय उभा राहतो, सगळा मला तयार असतो पण विकायचा कसा हेच माहित नसल्यामुळे लाखोंचा माल कित्येक दिवस तसाच पडून राहतो. एक महिन्यासाठी असलेला माल सहा महिने विकत बसलं तरी विकला जात नाही. एक टप्पा असा येतो कि किमान यातला खर्च तरी निघावा म्हणून मग कुठेतरी हातपाय मारले जातात. पण त्यातही अपयश येतं.
मी स्वतः अशीच एक चूक करण्यापासून वाचलेलो आहे. शिक्षण संपल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला माझ्या डोक्यात पाणी बॉटल कंपनीचं नियोजन होतं. प्रोजेक्ट विषयी खूप माहिती घेतली होती. बऱ्याच कंपन्यांना भेटी दिल्या, मशिनरी सप्लाय करणाऱ्या चार पाच कंपन्यांशी चर्चा केली. पूर्ण प्रोजेक्ट प्रोफाइल तयार केले. प्रोजेक्ट कॉस्ट वर काम केले. बॉटल सप्लाय करणारे शोधले. ब्रँडनेम सुद्धा ठरवले. बँकांशी कर्जासंबंधी चर्चा झाली. पन्नासेक लाखाची गुंतवणूक होती. पण काही कारणाने हा प्रोजेक्ट पुढे सरकू शकला नाही. कालांतराने दुसऱ्या व्यवसायात प्रवेश झाला…
पण पुढे दोनच वर्षात लक्षात आलं कि बरं झालं तो प्रोजेक्ट पुढे सरकला नाही. कारण मी सगळी माहिती घेतली होती पण विक्रीसंबंधी माझ्या डोक्यात असलेल्या काल्पनिक आकड्यांवर मी विसंबून होतो. पाणी बॉटल ला खूप मागणी आहे या एकाच निकषावर मी पुढे चाललो होतो. विक्रीचा कोणताही ठोस आराखडा माझ्या समोर नव्हताच, नाही मला विक्रीचा कोणता अनुभव होता, आणि मला यासंबंधी मार्गदर्शन करणारे सुद्धा कुणी नव्हते. जे काही चालू होत ते माझ्याच डोक्यातून आलेल्या कल्पनेतून. दोन तीन वर्षात जसजसा व्यवसायाचा अनुभव येत गेला तसं लक्षात आलं कि लाखो रुपये बुडण्यापासून वाचले. कारण विक्रीचा कोणताही प्लॅन नसताना साहजिकच ते प्रोडक्शन विकणे अशक्यच झाले असते. लोकांशी बोलायचे कसे, सेल्स चॅनल कसा चालतो, व्होलसेल रेट कसा आहे, डिस्ट्रिब्युशन कसे केले जाते, नेटवर्क कसे तयार केले जाते, स्पर्धा कशी आहे, सिझन नुसार विक्रीमध्ये कसे चढउतार होतात यासंबंधी कोणतीही माहिती मी घेतलेलीच नव्हती. फक्त मागणी आहे या एकाच निकषावर माझ्या डोक्यात एक प्लॅन आला होता आणि मी त्या बळावर लाखोंची गुंतवणूक करायचा प्रयत्न करत होतो, आणि या गुंतवणुकीच्या बळावर लाखो रुपये कमावण्याचे काल्पनिक आकडे सुद्धा मांडत होतो.
“वाचलो”… एवढा एकंच शब्द इथे लागू होतो… नाहीतर जोशजोश मधे व्यवसाय सुरु करून, लाखोंची गुंतवणूक करून पुढे दोन-तीन वर्षातच सगळं काही संपवून निवांत होणाऱ्यात माझाही नंबर लागला असता हे निश्चित…
व्यवसाय क्षेत्र सोपे आहे कि अवघड हा मुद्दाच कधी नसतो, तुमच्या पुरेसा अभ्यास आणि अनुभ नसेल तर कितीही सोपा व्यवसाय असला तरी प्रचंड अवघडच वाटेल… काल्पनिक आकडे मांडू नका. स्वप्नरंजनात रामू नका… माहिती घ्या, मार्गदर्शन घ्या, ज्ञान मिळवा, अनुभव घ्या मगच निर्णय घ्या…
व्यवसाय साक्षर व्हा…
_
@ श्रीकांत आव्हाड