एक उद्योजक आहेत. ३० वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. त्यांच्या मुलाला त्यांनी स्टोन क्रशर ची जाळी बनवण्याचा उद्योग सुरु करून दिलाय. उद्योग चांगला चालू आहे, पण उत्पन्न महिन्याच्या हफ्त्यापेक्षा कमी आहे. महिन्याला १ ते दीड लाख रुपये खिशातून भरावे लागत आहेत.
आता यावर सामान्यपणे उपाय काय आहेत?
१. आपले प्रोडक्शन वाढवणे, विक्री वाढवणे, ज्यामुळे उत्पन्न वाढून हा लाखभराचा भार कमी करता येईल
२. काही प्रोडक्ट वाढवणे ज्यामुळे उलाढाल वाढू शकेल.
३. प्रोडक्शन वाढवण्यासाठी पैसा नसेल तर आपल्या सध्याच्या ग्राहकांना सप्लाय करता येईल असे आणखी काही प्रोडक्ट शोधणे आणि त्याचे उत्पादक शोधून त्यांच्याशी टायअप करून आल्या कस्टमरला तो माल विकणे. यातूनही उत्पन्न वाढेल.
४. जुने कर्ज कमी करून नवे कमी व्याजाचे कर्ज घेणे… ज्यामुळे महिन्याचा हफ्ता कमी होईल.
५. शेवटचा मार्ग, कर्जाची रक्कम कमी करणे ज्यामुळे हफ्ता कमी होईल. यासाठी मार्ग काय असतो? तर एखादी प्रॉपर्टी विकून त्यातून आलेला पैसा कर्ज कमी करण्यासाठी वापरणे…
बर, सध्याच्या चर्चेमध्ये हे उपाय आम्ही डिस्कस करत होतोच… पण त्यांच्या १२ तासाच्या शिफ्ट मधे जेवढं प्रोडक्शन होतंय तेवढं १००% विकलं जातंय… म्हणजे बिजनेस लॉस मध्ये नाहीये… मग चकतंय कुठे ?
त्यांनी व्यवसायासाठी स्थानिक MIDC एरियामधे जमीन कर्जावर घेतली आहे. जे कर्ज आहे ६० लाख रुपयांचे. आणि त्यावर आपला ३० लाख गुंतवणुकीचा प्रोजेक्ट उभारलेला आहे. त्यांचा प्रोजक्ट त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा देत आहे, पण प्लॉटसाठी जो पैसा घातला आहे त्यातून त्यांना परतावा शून्य आहे आणि त्याचा भाग व्यवसायावर पडला आहे. जो पैसा खिशातून द्यावा लागतोय तो पैसा प्रत्यक्षात या प्लॉट मधून मिळणे आवश्यक होते.
कोणत्याही व्यवसायासाठी जेव्हा आपण काही गुंतवणूक करतो तेव्हा ती गुंतवणूक तीन वर्षात व्याजासहित वसूल होणे अपेक्षित असते. यांच्या प्लॉट ची रक्कम कर्जाऊ आहे, तरीही कर्जाच्या हिशोबाने जरी पाहिलं तरी यांना प्लॉटमधून कमीतकमी दीड ते २ लाख रुपये उत्पन्न प्रत्येक महिन्याला येणे आवश्यक होते. पण प्लॉट मधून शून्य उत्पन्न मिळत आहे, आणि याचा सगळा भार त्यांच्या व्यवसायावर पडत आहे. व्यवसायातून येणारे उत्पन्न योग्य प्रकारे मिळत असूनही ते प्लॉटमुळे निर्माण झालेले जास्तीचे हफ्ते फेडण्यात खर्च होत आहेत. आणि यामुळे आर्थिक गोष्टींमधे ट्रॅप झाले आहेत. याला थोड्या वेगळ्या प्रकारे पाहिलं तर, जर यांनी त्या प्लॉट च्या एरियाएवढे शेड भाड्याने घेतले असते तर त्यांना एवढेच भाडे द्यावे लागले असते जेवढा आत्ता त्यांना जास्तीचा हफ्ता पडतो आहे. आणि हा हफ्ता त्यांच्या व्यवसायातून निघणे शक्य नाहीये. त्यांना ती रक्कम भरणे जड आहे कि नाही हा माझा मुद्दा नाही, त्यांना सगळं काही व्यवस्थित चालू असूनसुद्धा खिशातून हफ्ते भरावे लागत आहेत हा मुद्दा आहे.
म्हणजे आपण सुरुवातीला जे उपाय पहिले ते उपाय इथे कामी येणार नाहीत, कारण व्यवसाय योग्य चालू आहे, पण आपल्याला ६० लाख रुपये गुंतवणुकीवर परतावा कसा मिळेल हे शोधायचे आहे, आणि मुख्य म्हणजे या समस्येचे मूळ न चालणारा व्यवसाय हे नसून अतिरिक्त हफ्त्यांचा भार हे आहे, म्हणजे समस्येवर घाव घालायचा म्हटलं तर कोणत्याही परिस्थितीत त्या प्लॉटमधून उत्पन्न कसे मिळेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यावर आम्ही तिथे इंडस्ट्रिअल शेड उभारून काम होऊ शकते का हे पाहण्यावर आता चर्चा थांबवली आहे, लवकरच ते काय निर्णय घेतात हे कळेल…
_
हे झाले उदाहरण
आपण कोणत्याही व्यवसायात जेव्हा पैसे गुंतवतो तेव्हा त्यावर दरवर्षी किमान ३०-३५% परताव्याची अपेक्षा ठेवत असतो. हा परतावा त्याच पैशातून आला पाहिजे. आता जर एखाद्या व्यवसायासाठी ६० लाख रुपये जमिनीसाठी आणि ३० लाख रुपये प्रोजेक्टसाठी गुंतवले असतील तर त्या प्रोजेक्टची एकूण गुंतवणूक ९० लाख रुपये होते, आता तो ३० लाखाचा प्रोजेक्ट ९० लाखाच्या गुंतवणुकीचा परतावा देऊ शकतो का हे पाहणे महत्वाचे आहे, आणि ते जवळजवळ अशक्य आहे. या ऐवजी जर त्यांनी एक लहानसा प्लॉट १०-१२ लाखात एक लहानसा घेतला असता तर कदाचित त्या ३० लाख गुंतवणुकीच्या प्रोजेक्टने ४० लाख गुंतवणुकीवर सुद्धा परतावा मिळवून दिला असता… हे आर्थिक गणित व्यवसायात जुळवणे आवश्यक असते.
बऱ्याच जणांना उद्योग सुरु होण्याआधीच प्लॉट घेण्याची घाई असते. पण अशा चुका झाल्या तर ते अंगलट येत असते. प्लॉट कधी घ्यायला पाहिजे ? याला कोणता फॉर्म्युला नाही, पण सामान्यपणे जेव्हा आपला बिजनेस बऱ्यापैकी सेट झालेला असेल आणि कर्ज जरी मिळत असेल तर त्यासाठी लागणारे डाउनपेमेंट हे आपल्या एकूण नफ्याच्या १५-२०% पेक्षा जास्त नसेल तेव्हाच आपण उद्योगासाठी प्लॉट घेणे योग्य असू शकते. अगदी रोखीने जरी प्लॉट घ्यायचा असेल तरी आपल्या एकूण निव्वळ मिळकतीमधून त्यासाठी जास्तीत जास्त २०% रक्कम खर्च करणेच योग्य असू शकते. त्यापेक्षा जास्त नाही. कारण त्यापेक्षा जास्तीचा पैसा प्लॉटसाठी खर्च करण्यापेक्षा व्यवसायात लावला तर जास्त फायद्याचे ठरते. आणि बऱ्याचदा उद्योगासाठी असे मोठे प्लॉट विकत घेण्यापेक्षा शेड किंवा मोकळे प्लॉट भाड्याने घेतलेच परवडतात. MIDC मध्ये मोठमोठ्या कंपन्या सुद्धा १०-२० वर्षे अशाचप्रकारे भाड्याने घेतलेल्या शेड मधेच काम करतात. कालांतराने गुंतवणुकीचे नियोजन जुळले तरच प्लॉट घेऊन कंपनी उभी करतात.
कंपनीसाठी प्लॉट घेताना ती कंपनीची गुंतवणूक आहे हे गृहीत धरूनच प्रोजेक्ट कॉस्ट काढावी. कर्जाऊ रकमेवर प्लॉट घेतला असेल तर त्याचे हफ्ते त्या प्लॉटमधूनच कसे निघतील हे पाहणे आवश्यक आहे. आणि प्लॉटमधून निघणे शक्य नसेल तर ती रक्कम व्यवसायाच्या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये धरून त्यानुसार नियोजन करावे. अधांतरी अंदाजांवर उद्योगात पैसा ओतू नये, किंवा अतिरिक्त आकडेवारी मांडून फक्त आपले समाधान कधीच करून घेऊ नये. आर्थिक अडचणीत येण्याचे कारण फक्त व्यवसाय न चालणे हे कधीच नसते. चुकीचे आर्थिक नियोजन हेच आर्थिक अडचणीचे मुख्य कारण आहे.
तुम्ही काहीही करा, पण त्यात जेव्हा कुठे काही पैसा गुंतवता, किंवा त्यासाठी कुठूनतरी पैसा उभा करता तेव्हा आर्थिक दृष्टिकोनातून पुरेपूर अभ्यास करूनच गुंतवा. वरकरणी पाहता यात काहीच विशेष वाटणार नाही, पण जेव्हा एखादी समस्या निर्माण होऊन आर्थिक ट्रॅपमध्ये आपण अडकतो तेव्हा त्यातून बाहेर येण्याऐवजी आपण त्यात आणखी अडकत जातो.
व्यवसायात आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. वर सांगितलेला एक किस्सा आहे, असे माझ्याकडे कित्येक क्लायंट्स चे कितीतरी किस्से आहेत. मला आठवतील तसे मी सांगतोच. आत्ता यांचेशी फोनवर बोलणं झालं म्हणून लागेचच लिहिलं. हे वाचून किती जण सावध होतात हे मला माहित नाही, पण किमान बेसिक गोष्टींवर जरी काम करता आले तरी बऱ्याच जणांना आर्थिक फटका बसण्यापासून आपला बचाव करता येईल.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड