२०१८-१९ मध्ये सुरु झालेल्या बऱ्याचशा व्यवसायांचा २०-२१ मध्ये पूर्ण कार्यक्रम वाजला आणि २०२०-२१ मध्ये सुरु झालेल्या बहुतांशी व्यवसायांचा सुद्धा उतरता आलेख आता दिसायला सुरुवात झालेली आहे. कशामुळे?
दुकानांबाहेर ‘भाड्याने देणे आहे’ चे बोर्ड भरपूर दिसायला लागले आहेत, लहान लहान व्यवसाय सुरु करणारे आता पुन्हा नोकरीच्या शोधात आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सुरु करणारे आता हफ्ते फेडूनच दमायला लागले आहेत. कशामुळे?
२०२० नंतर नवीन व्यवसाय सुरु करण्याची लाट प्रमाणाबाहेर वाढली. यात व्यवसाय सुरु करणाऱ्यांपैकी कित्येकांना व्यवसायाचे बेसिक्ट्स सुद्धा माहित नव्हते, पण आसपासच्या बऱ्याच जणांनी सुरु केलाय म्हणून आणि स्टेट्स दाखवायला म्हणूनही बऱ्याच जणांनी व्यवसाय सुरु केले… युट्युब वर मोटिव्हेशनल व्हिडीओ पाहून, सक्सेस स्टोरी पाहून, फेसबुक इंस्टाग्राम वरचे उद्योजकतेच्या नावाखाली मोटिव्हेशनल डायलॉगच्या भडिमाराने प्रभावित होऊन व्यवसाय सुरु करणाऱ्यांची गणतीच करता येणार नाही… पण या गोष्टींमुळे बिजनेस यशस्वी होत नसतो. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजनच लागते. आणि हे नियोजन करण्यासाठी एक तर पुरेसा अनुभव किंवा अनुभवी लोकांचे मार्गदर्शन सोबतीला असावे लागते.
आपली सर्वात मोठी समस्या आहेत ती आपण शिकण्याला कधीच प्राधान्य देत नाही… आपल्याला अनुभवी लोकांकडून चार मोलाचे शब्द ऐकणे अपमानजनक वाटते, सल्ले घ्यायला नको वाटतं, वास्तवापेक्षा स्वप्नात रमायला आपल्याला खूप आवडतं.. याचा परिणाम असा होतो कि आपल्याला जे काही शिकणं आवश्यक असतं ते व्यवसायात बसणाऱ्या वेगवेगळ्या झटक्यांमधूनच शिकावं लागतं.. यातही समस्या अशी आहे कि आपण त्यातून शिकण्याऐवजी तिथेही कुणावरतरी दोषारोप ढकलण्यात समाधान मानतो… त्यामुळे तिथेही आपल्या ज्ञानामध्ये काही अनुभवाची भर पडेल असे होत नाही.
व्यवसायाला एकेक पायरी पुढे घेऊन जाऊ शकेल अशी कोणतीच वातावर्निर्मिती आपण व्यवसायामध्ये निर्माण करत नाही… ज्या प्रकारे एखादा खेळाचा सामना जिंकण्यासाठी सर्व बाजूंचा विचार करत एक एक पायरी निश्चित करून त्यावर पुरेपूर अंमलबजावणी करावी लागते त्याच प्रकारे व्यवसायातही परिपूर्ण नियोजन आवश्यक असते. पण याकडे कुणाचे लक्ष जाताना दिसत नाही.
आठपंधरा दिवसांतून, महिनाभरातुन एकदा एखाद्या अनुभवी व्यावसायिकाकडे जाणून बसावे, चार मोलाचे शब्द ऐकावे असं आपण कधी करत नाही, ते शक्य नसेल तर किमान चारपाच व्यावसायिकांचा समूह असावा, आठवड्यातून एकदा एकत्र बसावे व्यवसायावर गप्पा माराव्यात असेही आपण कधी करत नाही. दूर कशाला आपल्या जवळच्या एखाद्या १० वर्षे जुन्या असलेल्या कोणत्याही दुकानात जाऊन त्या दुकानदाराशी चांगले संबंध प्रस्थापित केले तर तोही कळतनकळत तुम्हाला कितीतरी अनुभव देऊन जातो. ज्या गोष्टी माहित करून घेण्यासाठी आपल्याला १० वर्षे लागणार असतात त्या गोष्टी तो दुकानदार तुम्हाला दररोजच्या गप्पांमधून आठवड्याभरात सहज सांगून जातो.
कुठून काय घ्यायचं असतं हेही बहुतेकांना कळत नाही. आपण एखाद्या व्यावसायिकांच्या समूहाला जॉईन झालो तरी तिथे अनुभव ऐकायला, चर्चा करायला प्राधान्य दिलेच जात नाही, फक्त कमर्शिअल दृष्टिकोनातून कुणाकडून ग्राहकांचे रेफरन्स मिळतील का एवढेच पहिले जाते. ते होत नसेल तर तो समूह कामाचा नाही म्हणून आपण लगेच त्यातून बाहेर पडतो. अशा समूहातील लोकांमध्ये तासभर बसल्यावर मिळणारे ज्ञान हा आपल्याला फायदा वाटतच नाही. जी गोष्ट व्यवसायासाठी सर्वात महत्वाची असते ती गोष्ट आपल्या दृष्टीने सगळ्यात बिनकामाची ठरवली जात आहे… अशावेळी कितीही रेफरन्स घेतले तरी २० मध्ये सुरु झालेला व्यवसाय २३ मध्ये बंद पडायला सुरुवात होतेच. कारण व्यवसाय फक्त विक्री करूनच चालत नाही, तर तो सर्वांगीण विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करावे लागते, आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला प्रशिक्षित करावे लागते.
भरपूर विक्री असणारे व्यवसाय सुद्धा संपतात, ते कसे संपतात हे त्या व्यवसायिकाच्याही लक्षात येत नाही, इतके अलगदपणे ते संपत जातात. पण ते बंद पडण्याचेही कारण हेच असते कि नवउद्योजक आपल्या स्वप्नात रमलेले असतात आणि व्यवसायातील प्रत्यक्ष चढउतारांकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष होत असते. करोडोंच्या उलाढाली असणारे व्यवसाय आर्थिक अडचणीत आलेले मी पाहिलेले आहेत, आणि ते सावरण्यासाठी किती ऊर्जा खर्ची घालावी लागते मला चांगलेच माहित आहे. एकदोन वर्षांचे झालेले नुकसान भरून काढले तरी पुढच्या ५-१० वर्षांचे नुकसान झालेले असतेच, ते भरून काढणे कधीही शक्य होत नाही.
मी मागच्या चारपाच वर्षात ज्या काही व्यवसायांना आर्थिक अडचणीत बाहेर काढण्यासाठी कन्सल्टेशन केलेले आहेत त्यातले बहुतांशी व्यवसाय अशा क्षुल्लक कारणांमुळे अडचणीत आलेले होते कि योग्य वेळेला त्यांच्या एखादया जवळच्या अनुभवी व्यक्तीकडे ते गेले असते तर ते त्याचवेळी इतके अलगदपणे त्यातून बाहेर पडले असती कि पुढच्या निर्माण झालेल्या कोणत्याही अडचणीत ते अडकलेच नसते. क्वचित एखाद्यावेळी असे झालेले आहे कि त्या अडचणीच्या पहिल्याच टप्प्यात एखादा व्यावसायिक माझ्याकडे आलेला आहे आणि पुढच्या ट्रॅपमध्ये अडकण्याआधीच मी त्याला थांबवू शकलो आहे. पण हे प्रमाण अगदीच नगण्य आहे. जोपर्यंत नाकातोंडात पाणी जात नाही तोपर्यंत हातपाय हलवायचे नाही हा आपला मंत्र झाला आहे आणि तो नेहमीच आपल्या अंगलट येत आहे.
व्यवसायात काही अडचण वाटत असेल तर कुणाचेतरी तात्काळ मार्गदर्शन घ्या. कुटुंबातील वडिलधाऱ्यांशी चर्चा करा, ओळखीच्या अनुभवी व्यावसायिकांना भेटा, व्यावसायिक मित्रांशी चर्चा करा, योग्य व्यक्तीचा सल्ला घेण्याला प्राधान्य द्या. एखादा गुरु निवडा, जो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील. पण एकांतात राहून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडचे मार्ग संपलेत म्हणून तर अडचण निर्माण झाली आहे…
लोकांना आपल्या अडचणी सांगण्यात कमीपणा नसतो, मित्रांना आपल्या अडचणी सांगण्यात अपमानजनक काहीही नसते, लोकांकडून सल्ले घेण्यात काहीही अपमानजनक नसते हे लक्षात घ्या. अनुभव ऐकणे, वाचन करणे, ज्ञान मिळवणे, सल्ला घेणे, आपल्या अडचणी मांडणे प्रत्येक उद्योजकासाठी फार आवश्यक असते आणि यासाठी मीपणा दूर करणे, अहंगंड दूर करणे आधी क्रमप्राप्त असते.
व्यवसाय साक्षर व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड