shrikantavhad950@gmail.com

गणपती हा गणपतीच असतो, तो एखाद्या मंडळाचा भारी आणि एखाद्याचा साधा असा कसा असेल?

गणपती हा गणपतीच असतो, तो एखाद्या मंडळाचा भारी आणि एखाद्याचा साधा असा कसा असेल?

गणपती हा गणपतीच असतो, तो एखाद्या मंडळाचा भारी आणि एखाद्याचा साधा असा कसा असेल?

एखाद्या मंडळात सेलिब्रिटी जातात म्हणून तो गणपती भारी, असंही काही नसतं. खरं तर सेलिब्रिटी यावेत म्हणून ती मंडळं त्या सेलिब्रिटींना करोडो रुपये देतात, सेलिब्रिटी आले म्हणून तो गणपती सेलिब्रिटी होतो, मग त्या गणपतीला भेट देऊन आपल्यालाही सेलिब्रिटी झाल्याचं समाधान मिळतं, मग आपण त्या मंडळाच्या दानपेटीत करोडोंचं दान देतो, पुढच्या वर्षी त्याच दानातून ते मंडळ आणखी सेलिब्रिटींना बोलवतं… हे चक्र असंच चालू राहतं… यातून त्या मंडळांची सॉफ्ट पॉवर आणि पॉलिटिकल पॉवर वाढते हा भाग वेगळा

एखाद्या लहानश्या मंडपातील गणपती खालच्या दर्जाचा असतो आणि मोठ्या मंडळाचा आणि भव्य दिव्य मंडपातला गणपती वरच्या दर्जाचा असतो असंही काही नसतं, किंवा आपण कोणत्या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेतोय यावरून आपला सुद्धा दर्जा ठरत नसतो… कारण गणपती हा फक्त गणपतीच असतो, तो लहान-मोठा भारी-साधा असूच शकत नाही…

बर… मोठी मूर्ती म्हणजे भारी गणपती आणि लहानशी मूर्ती म्हणजे साधा गणपती असंही काही नसतं, पण आपल्याला तसं वाटतं म्हणून मंडळांनाही मोठ्या मुर्त्या घ्याव्या लागतात ज्यामुळे आपल्यावर त्या गणपतीचा पगडा बसेल… त्यांचंही बरोबर आहे, एक फुटाच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने दर्शन तरी घेणं शक्य आहे का? कसं वाटेल ते? एवढ्या बारक्या गणपतीसाठी एवढ्या ट्राफिक मधून जायचं, रांगेमध्ये चार तास उभं राहायचं, पुन्हा त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून चार शिव्या खायच्या, कधीमधी मारही खायचा, आणि हे सगळं फूटभर उंचीच्या मूर्तीसाठी..? बिलकुल परवडत नाही, ती मूर्ती कशी किमान २० फूट उंच पाहिजे, तरच एवढ्या खस्ता खाल्लेल्या परवडतात.. असले बारीक गणपती तर चौकाचौकात सापडतात… त्याला कुठे सिरियसली घेता?
पण खरं तर गणपती हा गणपतीच असतो, तो आपल्या घरात असला काय, शेजारच्या चौकातल्या लहानश्या मंडपात असला काय किंवा मोठ्या सेलिब्रिटी मंडळातला असला काय… तो सगळीकडे सारखाच असतो…

विसर्जन मिरवणूक लांबण्याला विक्रम म्हणणे हाही बाष्कळपणाच, यात कौतुकास्पद काहीच नाही, उलट याला विक्रम म्हटल्याने पुढच्या वर्षी हा विक्रम मोडण्यासाठी मंडळे आधीपासूनच तयारी करतील हेही आपल्या लक्षात येत नाही…

गणपतीसमोर मिरवणूक, DJ चा आवाज, हे आपले चोचले आहेत, गणपतीचे नाही, तो तर सर्वांसाठी विघ्नहर्ता आहे, तो सामान्य लोकांना त्रास का देईल? दोन दोन दिवस संपूर्ण शहर ठप्प करणे आणि लोकांच्या कानाचे पडदे फाटतील एवढ्या मोठ्या आवाजात DJ लावून नाचणे हि गणपतीची गरज बिलकुल नाहीये, ती फक्त आणि फक्त मंडळांच्या कार्यकर्त्यांची गरज आहे… खरं तर गणपतीची आरती म्हटली, भक्तिभावाने जयघोष केला, आणि विसर्जन केले तरी पुरेसे असते… गणपतीला वाटं लावताना जल्लोष कसा होऊ शकतो हा प्रश्न आजवर कुणाला कसा पडला नाही असा प्रश्न मला नेहमीच पडतो…

मोठमोठी मंडळे, मोठमोठे मंडप, उंचचउंच मुर्त्या, DJ चा धिंगाणा, बॅनरबाजी, विचित्र हावभाव करून नाचगाणे हि गणपतीची गरज कधीच असू शकत नाही, आणि समाजाची तर बिलकुलच नाही, ती फक्त राजकारण्यांची, चौकाचौकातल्या टोळक्यांची गरज आहे. त्यांना आपल्यासमोर यायचंय, स्वतःला प्रमोट करायचंय आणि कोणत्याही मार्गाने त्यांच्या कार्यकर्त्यांना खुश ठेवायचंय एवढंच आता सार्वजनिक गणेशोत्सवाचं उद्दिष्ट राहिलेलं आहे, (गोपाळकाल्याचंही तेच झालंय) आणि आपल्यालाही तेचं पाहणं आवडायला लागलं आहे… असं नसेल तर एक वर्ष कोणत्याही बॅनरवर, पोस्टरवर कोणत्याही व्यक्तीचे नाव, किंवा फोटो असणार नाही असा निर्णय घेऊन पहा, ८०% मंडळं कमी होतील… आणि त्यावेळी सुद्धा गणपती हा नेहमीचाच गणपती असेल… कारण मंडळं कमी असो किंवा जास्त, त्याला काय फरक पडणारे? त्याचा आशीर्वादाचा हात तसाच वर असणार आहे…

_

श्रीकांत आव्हाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *